अखेर कॅन्सरशी झुंज अयशस्वी, ज्युनिअर महमूद यांचं निधन

मुंबई : मागील काही दिवसांपासून कॅन्सरशी लढा देणारे ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांची आजाराशी झुंज अयशस्वी ठरली. ज्युनिअर महमूद यांचं गुरुवारी रात्री निधन झालं आहे. वयाच्या ६७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्युनिअर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काजी यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून ज्युनिअर महमूद कॅन्सरशी झुंजत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचे मित्र आणि अभिनेते जितेंद्र आणि सचिन पिळगावकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या दोन्ही मित्रांनी त्यांची ही इच्छा देखील पूर्ण केली होती.

दुपारी १२ वाजता होणार अंत्यसंस्कार

ज्युनिअर महमूद यांचे जवळचे मित्र सलाम काजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महमूद यांना फुफ्फुसं आणि लीव्हरमध्ये कॅन्सर होता. त्याशिवाय त्यांच्या आतड्यांमध्येही ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. त्यांचा कॅन्सर चौथ्या स्टेजला होता. त्यांची तब्येत सतत खालावत चालली होती. ते मागील काही दिवस व्हेटिंलेटर सपोर्टवर होते. अखेर गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. शुक्रवारी (८ डिसेंबर रोजी) दुपारी १ वाजता ज्युनिअर महमूद यांच्यावर सांताक्रूझ येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ज्युनिअर महमूद यांचं खरं नाव नईम सैय्यद असं होतं. १५ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी ७ भाषांमध्ये २६५ सिनेमांहून अधिक सिनेमात काम केलं होतं. त्याशिवाय त्यांनी मराठी सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं. बालकलाकार म्हणून सिनेमात काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यांच्या ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी सिनेसृष्टीत मोठं योगदान दिलं आहे. त्यांच्या कॉमेडी भूमिकांनी प्रेक्षकांमध्ये मोठी लोकप्रियता मिळवली होती.