धुळे : धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी संचालकांच्या नावे सात लाखांची लाच मागून ती स्वीकारताना धुळे इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि, नवी दिल्लीचे अकाउटींग व फायनान्स अधिकारी हरीष सत्यवली यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, कंपनीचे संचालक प्रदीप कटीयार यांच्या सांगण्यावरून ही लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनादेखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.
सात लाखांची लाच भोवली
कोअर असोसिएटस कंपनीने चांदवड टोल प्लाझाच्या व्यवस्थापना बद्दलचे डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 चे रिअम्बर्समेंन्ट रक्कम अदा करण्यासाठी व कोरल असोसिएटसने धुळे लळिंग टोल प्लाझा व्यवस्थापनाचा ठेका मिळण्यासाठी भरलेली निविदा मंजुर करण्यासाठी तक्रारदाराकडे रविवार. 19 रोजी इरकॉन सोमा टोलवेच्या धुळ्यातील मुख्य कार्यालयात फायनान्स अधिकारी हरीष सत्यवली यांनी स्वतःसाठी दोन लाख व कंपनीचे संचालक प्रदीप कटीयार यांच्यासाठी पाच लाखांची लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून मंगळवारी सायंकाळी सत्यवली यांना अटक करण्यात आली. इरकॉन सोमा टोल वे प्रा.लि. कंपनीच्या धुळे लळिंग टोल प्लाझा जवळील मुख्य कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.
यांनी केला सापळा यशस्वी
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, भुषण खलाणेकर, भूषण शेटे, गायत्री पाटील, रोहिणी पवार, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागुल, मकरंद पाटील आदींनी हा सापळा यशस्वी केला.