तरुण भारत लाईव्ह । ३० ऑगस्ट २०२३। रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो. बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देणारा हा सण. या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात. ही राखी त्यांच्या भवांकडून त्यांच्ये रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते. शब्दशः संस्कृत अर्थ संरक्षण, बंधन किंवा काळजी असा होतो. बहीण-भावाचा हा सण, ज्याचा उगम लोक संस्कृतीमध्ये झाला. पण तुम्हाला माहितीये का? रक्षाबंधनाची सुरवात कशी झाली? हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
तर पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शुचि हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळेल, अशी तिची श्रद्धा होती. इंद्राचा विजय झाला आणि त्याचे गेलेले वैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत पडली, असे सांगितले जाते. हिंदू पौराणिक कथेनुसार, महाभारतात, जे एक महान भारतीय महाकाव्य आहे, पांडवांची पत्नी द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या मनगटामधून वाहणारे रक्त थांबवण्यासाठी तिच्या साडीचा कोपरा फाडून त्याच्या मनगटावर बांधला कारण भगवान कृष्णाने अनवधानाने स्वतःला जखमी केले होते. अशा प्रकारे, भाऊ आणि बहीण आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात एक बंध निर्माण झाला आणि द्रौपदीचे रक्षण करण्याचे वचन दिले.
ऐतिहासिक काळात चित्तोडच्या राणी कर्मवतीने हुमाँयू बादशहाला राखी पाठवली व हुमायूॅं बादशहाने पण आपल्या या बहिणीचे बहादुरशहाने केलेल्या आक्रमणापासून संरक्षण केले. दुसरा आलमगीर बादशहा दिल्लीवर राज्य करीत होता. त्याच्या प्रधानाने कट आखून बादशहाचा खून केला व प्रेत नदीत टाकून दिले. एका स्त्रिने ते पाहिले. प्रेत वाहून जाऊ नये म्हणून तिने प्रेत पाण्याबाहेर काढले आणि प्रेताचा वाली येईपर्यंत प्रेताजवळ बसून राहिली. बऱ्याच वेळानंतर बादशहाच्या शोधात सैनिक तेथे आले. बादशहाचा मुलगा शहाआलम याने त्या हिंदू स्त्रीचे आभार मानले. तिला आपली बहीण मानले. ती हिंदू स्त्री पुढे दरवर्षी शहाआलमला राखी बांधू लागली. ही प्रथा पुढे अकबरशहा व बहादूरशहा यांनीही चालू ठेवली. इतिहासात याचा उल्लेख आहे. मुघल बादशहानी पवित्र मानलेला हिंदूंचा हा एकमेव सण आहे.
राखी बांधताना बहिणीने म्हणावे, – येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल ।। (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होत तशीच ही राखी मी तुझ्या हाताला बांधत आहे.)