सोयगाव : पूर्वी आपली गावे समृद्ध होती.कारण गावात परस्परावलंबित्व होते आणि त्यामुळे गाव स्वावलंबी होते. आज परस्परावलंबित्व कमी होत असल्यामुळे गाव स्वावलंबी व आत्मनिर्भर होत नाहीये.त्यासाठी आपल्याला गावातील समस्याचे उत्तर गावातच शोधावे लागेल असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत ग्रामसेवक गतिविधि संयोजक विलासअण्णा दहीभाते यांनी दि.४ रविवार रोजी केले,ते समर्पण फाउंडेशन व मोफत करिअर मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमास मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक व रा.स्व.संघाचे प्रांत ग्रामविकास संयोजक विलास दहीभाते यांची प्रमुख उपस्थित होती.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते गुलाबी फित कापून उद्घाटन करण्यात आले.यावेळी जिवन राजपूत व अनंत जगताप यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल फुसे,सूत्र संचालन ॲड स्वप्नील सुरळकर व आभार प्रदर्शन कल्पेश जोशी यांनी केले.समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख हर्षल फुसे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले,की सोयगाव तालुक्यातील काही स्वयंस्फूर्त तरुणांनी मिळून समाजाभिमुख काम करण्यासाठी ग्राम विकास,पर्यावरण संवर्धन,आरोग्यसेवा, कृषी अशा विविध क्षेत्रात सेवाकार्य करण्यासाठी संकल्प केला.त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.या माध्यमातून आम्ही गाव स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विलासअण्णा दहीभाते म्हणाले,गावातल्या समस्या गावात शोधून त्याचे उत्तर गावातच शोधले पाहिजे.गावातील लोकांनी त्यावर एकत्रितपणे काम केले पाहिजे.गावातल्या उत्पादित होणाऱ्या वस्तू पदार्थांना गावातच मार्केट उपलब्ध करून दिले पाहिजे.आपण प्रथम त्या वस्तुंचा प्राधान्य देऊन खरेदी केले पाहिजे.विदेशी,ब्रँडेड वस्तूचा आग्रह सोडला पाहिजे. असे केल्यास आपले गाव आणि आपली माणसं आत्मनिर्भर होईल.समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून सोयगाव,आमखेडा याठिकाणी हे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.यावेळी समर्पण फाऊंडेशनचे प्रमुख हर्षल फुसे,हेमंत नागापुरे,राजू फुसे,रवी गिरी,राहुल फुसे,अनिल फुसे,संकेत बैरागी,आकाश गव्हाड,सागर कोथलकर,सुरेश ढगे,मनोहर आगे,शंकर मिसाळ,सुदर्शन बारी,शुभम बोडखे,यश वामने,अनिल मोरे,सागर इंगळे,मंगेश ताडे,शिवा आगे,ओम रोकडे,विशाल परदेशी,मयुर राजपूत, इ.कार्यकर्त्यांनी कार्यक्रम व्यवस्थेसाठी मेहनत घेतली.
समर्पण फाउंडेशन तरुणांनी सुरू केलेली संस्था पाहून खूप आनंद झाला.ग्रामीण भागातील तरुण जर एवढे उच्च ध्येय आणि समाजहिताचा विचार करून असे कार्य सुरू करत असेल तर ही अभिमानाची गोष्ट आहे.मी सुद्धा याच भागातील एक सामान्य कार्यकर्ता असून गावातील समस्या मी पण पाहिल्या आहेत.आज मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे मी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी काम करतो.समर्पण फाउंडेशनच्या आम्ही सोबत आहोत आणि सर्वतोपरी मदत करू असे प्रतिपादन त्यांनी केले.
– रामेश्वर नाईक,मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुख, महाराष्ट्र राज्य