हृतिक रोशन, अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरवर गुन्हा दाखल करा : राष्ट्रवादी

मुंबई : ऑनलाईन रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित करणार्‍या जाहिरातींतील हिंदी आणि मराठी क्षेत्रातील चित्रपट कलाकारांवरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी परिपत्रक काढत अंकुश चौधरी, अमेय वाघ, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, शिवाजी साटम, मनोज जोशी, शरद केळकर, श्रुती मराठे, उमेश कामत, संतोष जुवेकर, गौरी नलवडे आणि अमृता खानविलकर यासारख्या कलाकारांची नावंही देण्यात आली आहेत. तसेच, हिंदीतील अभिनेते हृतिक रोशन, अन्नू कपूर, कुमार सानू, शक्ती कपूर, आलोक नाथ, रजा मुराद, अनुप सोनी, मनोज वाजपेयी, अली असगर, शिशिर शर्मा यांचा समावेश असल्याचंही पत्रकात नमूद आहे.

महाराष्ट्रात मटका किंवा पत्ते खेळण्यावर बंदी आहे. एखाद्या ठिकाणी अशा प्रकारचे खेळ खेळताना कोणी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र ऑनलाईन रमीमधून सर्रास महाराष्ट्रात अवैध धंदा सुरु आहे. या धंद्याला आणखी यशस्वी करण्यात मराठी चित्रपट कलाकार जाहिरात करुन लोकांना रमी खेळण्यास प्रवृत्त करत आहेत, असंही राष्ट्रवादीने म्हटलं आहे. मराठी कलाकारांनी आपल्या परिवारातील आई, वडील, भाऊ, बहीण अशा लोकांना रमी खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं असतं का? असा प्रश्नही विचारण्यात आला आहे.