चोपड्यात कापड दुकानाला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू

चोपडा – शहरातील मेनरोडवरील बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका युवकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

चोपडा शहरातील मेनरोडवरील बाजारपेठेतील राहुल एम्पोरियम या कापड दुकानाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यास मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये संपुर्ण घराच्या परिसरात ठेवलेल्या विक्रीच्या साडी,कापड यांच्यासह फर्निचर व घराचे लाखो रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे.या आगीत एका युवकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुमारे चार तास या आगीवर काबू मिळविण्यासाठी चोपडा,यावल,जळगाव,अमळनेर,शिरपूर येथील अग्नीशमन दलाचे कर्मचारी व अग्नीशामक तसेच परिसरातील नागरिक,तरुण परिश्रम घेत होते.

पत्नी, मुलीचा बचाव…पण

या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गौरव सुरेश राखेचा यानी आगीच्या वणव्यात जेमतेम वाचविण्यासाठी आलेल्या न.प.कर्मचारी दिपक बडगुजर,सौरभ नेवे व प्रवीण जैन यांच्या समवेत जाण्यास सांगितले.आणि तुमच्या मागे येतोच असे सांगितले.परंतु नेमका काळाने गौरवचा घात कसा केला.याची कल्पना कुणासच आली नाही.पहाटे पावणे सहाच्या सुमारास त्याचा मृतदेह अक्षरशः कोळस्याच्या स्वरूपात आढळून आला.या दुर्धर प्रसंगाने राखेचा (जैन) कुटुंबावर मोठा दैवी आघात या घटनेमुळे झाला आहे.

चोपडा पालिकेची ढिसाळ यंत्रणा

नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागावर या आगीच्या घटनेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अग्नीशामक बंब तातडीने यावा म्हणून प्रयत्न करणा-यांचे दुरध्वनीच संबधीत कर्मचारी उचलत नव्हते.अखेर थेट नगरपालिकेत मोटारसायकलने धाव घेतल्यानंतर पालीकेचा बंब आला.पण नवख्या कर्मचा-यांची त्रेधातिरपिट उडत होती.नागरिकांच्या मदतीने अग्नीशामक बंबातून पाणी मारणे चालू झाले.पण त्यामध्ये सुमारे अर्धा ते पाऊण तास गेल्यामुळे आगीने आणखीणच रौद्ररुप धारण केले होते. तथापी चोपड्याचे अग्नीशमन दल अपूर्ण पडेल हे लक्षात येताच पोलीसांनी वायरलेस यंत्रणेद्वारे कळवून यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथून अग्निशमन दलाच्या गाड्या मागवल्या. त्यानंतर तब्बल साडे चार तासांनी हि आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या भीषण आगीमुळे गौरव सुरेश राखेचा(जैन) वय २७ या तरुणाचा मृत्यु झाला.

या आगीमधून सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अजित सावळे, पोहेकॉं. जितेंद्र सोनवणे, पोना. मधुकर पवार, नितिन कापडणे, शुभम पाटील, हेमंत कोळी, हर्षल पाटील आदिंसह इतर पोलीस कर्मचारी यांनी तातडीने बचावकार्य राबविले. त्याबरोबरच चोपडा नगरपरिषद अग्निशमन दलासह यावल, धरणगाव, पारोळा, शिरपूर, अमळनेर व जळगांव येथील दलांनी आग विझविण्यासाठी महत्वाची भुमिका बजावली.

 

आगीच्या वणव्यातून बचाव कार्य करण्यासाठी नगर परिषदेच्या वीज विभागातील लिफ्टचा देखील वापर करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील, प्रविण जैन, सचिन सोनवणे, पत्रकार श्रीकांत नेवे, सतिष नेवे, राजेंद्र नेवे, लतीष जैन, चेतन कानडे, सौरभ नेवे, अमर बोहरा, अजय राजपुत, रवींद्र नेवे, मुक्तार सरदार, दिपक राखेचा, कमलेश जैन, सागर नेवे, शिवा पाटील आदिंसह इतर शहरवासियांनी बचावकार्यात मदत केली. यावेळी पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, संचालक नेमिचंद जैन, माजी नगरसेवक राजेंद्र जैस्वाल आदि उपस्थित होते.