मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत विरूद्ध न्यूझीलंड संघामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आज १५ रोजी उपांत्यफेरीचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट करून धमकी देण्यात आली आहे. संबंधित ट्वीट मंगळवारी रात्री प्राप्त झाले आहे. या ट्वीटमध्ये छायाचित्र असून त्यात बंदुक, हँडग्रेनेड व काडतुस आहे. या छायाचित्राखाली भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान आग लावण्याची धमकी देण्यात आली आहे.
या धमकीनंतर मुंबई पोलिसांच्या ट्वीटर सेलने याबाबतची माहिती मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली असून त्यानंतर गुन्हे शाखा व इतर विभागांना याबाबत कळवण्यात आले आहे. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
“१५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारत विरुद्ध न्युझिलंड या सेमी फायनल सामन्यासाठी मुंबई पोलीस दल वानखेडे स्टेडिअमवर सज्ज आहे”, अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. ते म्हणाले की, वानखेडे स्टेडिअमवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. “स्टेडिअममध्ये बॅग, पॉवर बॅग, नाणी, पेन्सिल, पेन, कोरे कागद, मार्कर, कोणत्याही प्रकारचे बॅनर्स, काही आक्षेपार्ह वस्तू, ज्वलनशील पदार्थ, काडीपेटी, लायटर, सिगारेट, गुटखा आदी वस्तूंना प्रतिबंध आहे.
या वस्तू ठेवण्यासाठी स्टेडिअममध्ये सोय नाही, याची नोंद घ्यावी”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. “प्रेक्षकांनी येताना खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. कारण, स्टेडिअम परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. लोकल ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनी गेट नंबर १, २ आणि ७ वर पोहोचण्यासाठी चर्चगेट स्थानकावर उतरणे सोयीचे राहील. तर गेट क्रमांक ३, ४ आणि ५ वर पोहोचण्याकरता मरिन लाईन्स स्थानकावर उतरणे सोयीचे ठरेल”, असंही त्यांनी सांगितलं.