भटिंडा : पंजाबमधील सर्वात जुन्या लष्करी छावणीत बुधवारी पहाटे गोळीबार झाला. भटिंडा येथे झालेल्या या हल्ल्यात ४ जणांचा मृत्यू झाल्याचे लष्कराने सांगितले. ठार झालेल्यांमध्ये सैनिक आहेत की नागरिक हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. लष्कराने सांगितले की, सकाळी ४:३५ वाजता अधिकार्यांच्या मेसमध्ये गोळीबार झाला. लष्करी छावणीत सर्च ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. लष्कराने अद्याप याला दहशतवादी हल्ला म्हटलेले नाही.
भटिंडा मिलिट्री कॅम्पमधून दोन दिवसांपूर्वी एक इन्सास रायफल आणि २८ काडतुसे गायब झाली होती. याच बंदुकीतून गोळीबार झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आर्मीचा पूर्ण एरिया सील करण्यात आला असून बाहेरील रस्त्यावर सर्व प्रकारची वाहने थांबवून तपासणी केली जात आहे. पोलिसांना हा सैन्याचा अंतर्गत विषय असल्याचे सांगून आतमध्ये जाऊ दिले जात नाहीय.
हा दहशतवादी हल्ला असल्याचे वाटत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. ८० मीडियम रेजिमेंट ऑफिसर्स मेसमध्ये सैन्यातील जवानाने आपल्या सहकार्यांवर हा गोळीबार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी राफयल आणि काडतुसे गायब झाली होती, असे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कॅम्प परिसरातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. लोकांना घरातच राहण्यास सांगण्यात आले आहे. ज्याने गोळीबार केला त्याला ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
आशियातील सर्वात मोठी छावणी अशी ओळख
भटिंडा छावणी ही आशिया खंडातील सर्वात मोठी लष्करी छावणी आहे. या मिलिटरी छावणीची हद्द सुमारे ४५ किलोमीटर आहे. येथील दारूगोळा डेपो हा देशातील सर्वात मोठ्या डेपोपैकी एक असल्याचे सांगितले जाते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत लष्कराकडून अहवाल मागवला आहे. पंजाब सरकारने भटिंडा पोलिसांकडूनही अहवाल मागवला आहे. लष्करी छावणीत सैनिकांची कुटुंबे राहतात. या घटनेनंतर लष्कराने सर्वांना आपापल्या घरात राहण्यास सांगितले आहे. कॅन्टोन्मेंटमधील शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. केंद्रीय यंत्रणांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पंजाब पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही कॅन्टमध्ये पोहोचले आहेत.