जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या तीन दिवसांपासून दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरु आहे. आज सकाळी झालेल्या चकमकीत आणखी एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या चार झाली. गेल्या ४८ तासांपासून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे.
बुधवारी दहशतवाद्यांशी लढताना झालेल्या चकमकीत दोन लष्कराचे अधिकारी यामध्ये एक कर्नल आणि मेजर होते. तसेच एक वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद झाले आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी अनंतनागमधील कोकरनाग जंगल परिसराला वेढा घातला आहे.
दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरु आहे. बुधवारी हे ऑपरेशन सुरु होते. ४८ तास झाले ऑपरेशन सुरु असून ४ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष आणि डीएसपी हुमायून भट हे शहीद झाले आहेत. तर आज मृत्युमुखी पडलेल्या चौथ्या सैनिकाची ओळख अद्याप समोर आलेली नाही.
कर्नल मनप्रीत सिंग आणि मेजर आशिष धोनचॅक यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी पानिपत येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. उपअधीक्षक हुमायून भट यांच्यावर बुधवारी त्यांच्या बडगाम येथील निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात आले. चकमकीनंतर भारतीय लष्कराने गुरुवारी मृतदेह श्रीनगरला एअरलिफ्ट केले होते. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली वाहण्यात आली.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दहशतवादी ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या लष्करे तोयबाशी संलग्नीत संघटनेचे असल्याचे समजते. या परिसरात दोन-तीन दहशतवादी लपून बसल्याचा सुरक्षा दलांना संशय आहे. हेरॉन ड्रोन आणि क्वाडकॉप्टर या परिसरात पाळत ठेवण्यासाठी आणि शोध मोहिमेत मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.