नंदुरबार : नंदुरबार जिल्हयात दि. १३ व १४ मे रोजी झालेल्या बेमोसमी पावसामुळे पाच घरांची पूर्णतः, तर १४ घरांची अंशतः पडझड झाली. वीज पडून दोन बालके जखमी झाली. तसेच एका गोठयाचे नुकसान झाले असून, शेती पिकांच्या नुकसानाबाबत यंत्रणेमार्फत पंचनामे सुरु झाले आहेत.
नंदुरबार जिल्हयात गेल्या आठवडयापासून अवकाळीचा कहर सुरु आहे. दरम्यान, दि.१३ व १४ मे दरम्यान जिल्हयात झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे जिल्हयातील नंदुरबार व नवापूर तालुक्यात मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील ७ घरांची अंशतः पडझड झाली आहे. यात पाच घरांचे, एक कांदा चाळ व १ पोल्ट्री फार्मची भिंत पडून नुकसान झाले आहे .
नवापूरात सात घरांची अंशतः तर ४ घरांची पूर्णतः पडझड
नवापूर तालुक्यात सात घरांची अंशतः तर ४ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. तसेच अक्कलकुवा तालुक्यातील जांगठी (कोल्हीपाडा) येथे घरावर वीज पडून सायंकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान वीज पडून पृथ्वीराज अनिल वळवी (वय १३) व रितेश विरजी वळवी (१०)हे दोन बालक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेती पिकांचेही या पावसामुळे नुकसान झाले आहे. मात्र, नुकसानीचा क्षेत्रीय यंत्रणेमार्फत पंचनामे सुरु असल्याने पिकांच्या नुकसानाची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.