---Advertisement---
मालपूर (शिंदखेडा) : शिंदखेडा तालुक्यातील दुर्गम भागातील सुराय ग्रुप ग्रामपंचायत व वृक्षमित्र समितीतर्फे सुराय गावात वनमहोत्सव उत्साहात झाला. महोत्सवांतर्गत विविध प्रजातींची तब्बल पाचशेवर रोपे लावण्यात आली. रोपांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत संवर्धन होणार असून, ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाण्याची सोय करण्यात आली आहे.
वनमहोत्सवांतर्गत विविध कार्यक्रमही घेण्यात आले. या वेळी गावातून प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. सजविलेल्या पालखीत तुळस व वेगवेगळी रोपे ठेवण्यात आली होती. ग्रामस्थांनी वृक्षदिंडीचे घरोघरी पूजन केले, तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात वृक्ष असल्यामुळे वृक्षदिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. गावाच्या अमरधामनजीकच्या टेकडीवर वृक्षदिंडीचा समारोप होऊन वनमहोत्सवात कार्यक्रमाचे रूपांतर झाले.
या वेळी हरिभक्त परायण परमेश्वर नाना, वनविभागाचे दोंडाईचा येथील वनपाल प्रवीण वाघ, दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश दहिफडे, रवींद्र राजपूत, माजी सरपंच हेमराज पाटील, नयनकुंवर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. डी. गिरासे, वृक्षमित्र सुरेश पाटोळे, कर्ले बीटचे चंद्रकांत बोरसे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पवार, पंकज सोनवणे, सुराय ग्रुप ग्रामपंचायतीचे गटनेते मोहन जाधव, उपसरपंच गुलाब पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सागर भदाणे, पोलीसपाटील योगेश जाधव, एकनाथ पाटील, निवृत्त जवान रणवीर पाटील, शशिकांत पाटील, भटा मिस्तरी आदी उपस्थित होते.
सुराय गावाच्या अमरधामजवळील टेकडीवर ग्रामस्थांसह मान्यवरांच्या हस्ते वड, पिंपळ, उंबर, निंब, चिंच आदी प्रजातीची पाचशे रोपे लावण्यात आली. जेसीबी यंत्राच्या सहाय्याने रस्ता तयार करून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. रोपांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत संवर्धन होणार असून, ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाण्याची सोय करण्यात आली आहे.
मान्यवरांनी मनोगतात, यापुढे सार्वजनिक कार्यक्रमात हार, शाल, श्रीफळ, पुष्पहार यावर खर्च न करता रोपे देऊन सन्मान करावा व त्या रोपांची लागवड येथे करावी. तरुणांनी वाढदिवशी इतर वायफळ खर्चापेक्षा येथे एक रोप लावुन वाढदिवस साजरा करावा व ही नैसर्गिक टेकडी गावाच्या वैभवात भर घालेल. याला हातभार लावावा, असे आवाहन केले. प्रणाली पाटील व क्रांती पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वृक्षमित्र समितीने परिश्रम घेतले.