डॉक्टरांकडे पाच लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी ; तिघांविरोधात गुन्हा

 

तरुण भारत लाईव्ह न्युज बोदवड : डॉक्टरांबाबत बदनामीकारक मजकूर छापून त्याचे कात्रण सार्वजनिक जागी लावत पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी साप्ताहिकाच्या पत्रकारांसह तिघांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

चुकीचे उपचार केल्याचा आरोप करीत मागितली खंडणी

बोदवड शहरातील डॉ.यशपाल समाधान बडगुजर (42) यांचे ‘समछाया’ नावाचे हॉस्पिटल असून शहरातील सलीमशहा बशीरशहा यांनी डॉ. बडगुजर यांच्याकडे मुळव्याधाच्या आजारावर उपचार घेतले परंतु चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे कॅन्सर झाला, असा आरोप करत सलीमशहा यांनी डॉ.बडगुजर यांच्याकडे पाच लाखांची खंडणी मागितली तसेच खंडणी न दिल्यास पेपरमध्ये बदनामीकारक बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे शिवाय तसेच नंदू उर्फ नंदलाल श्याम पठे, अशोक भवरलाल झाबक (सर्व.रा. बोदवड) यांनी त्यांच्या ‘थर्ड आय’ या वृत्तपत्रामध्ये जाहिरात देण्यासाठी खंडणी मागितली तसेच खंडणी न दिल्यास डॉ.बडगुजर यांना पेपरमध्ये बदनामी कारक बातमी छापून बदनामी करण्याची धमकी दिली. त्यावर डॉ. बडगुजर यांनी खंडणी देण्यास नकार दिल्यानंतर पठे व झाबक यांनी त्यांच्या ‘थर्ड आय’ या वृत्तपत्रामध्ये डॉक्टरांचेबदनामीकारक वृत्त छापून पेपरचे कात्रण बोदवड शहरातील वर्दळीच्या ठिकाणी चिपकवून बदनामी केली, अशा आशयाची तक्रार डॉ. यशपाल बडगुजर यांनी पोलिसात केल्यानंतर तिघा संशयित आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय सुधाकर शेजोळे हे करीत आहेत.

जाहिरात मागितली ; खंडणी नव्हे

पत्रकार नंदलाल पठे या संदर्भात म्हणाले की, माझ्याकडे सलीम शहा बशीर शहा हे आले होते. त्यांनी जी माहिती दिली त्या आधारे मी साप्ताहिकात बातमी प्रसिद्ध केली होती. जाहिरात ही साप्ताहिक चालवण्यासाठी आम्ही सर्वांनाच मागतो. त्यास खंडणी म्हणणे चुकीचे होईल. दरम्यान, सलीम शहा बशीर शहा यांनी सुद्धा चुकीची शस्त्रक्रिया करून आपल्या शरीराचा सत्यानाश केल्याबद्दल डॉक्टर यशपाल बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज बोदवड पोलिस ठाण्यात दिल्याची माहिती आहे.