---Advertisement---
जळगाव : विजेचा धक्का लागून मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना एरंडोलच्या वरखेडी येथील एका शेतात बुधवारी सकाळी उघडकीस आली. यात एक दीड वर्षाची बालिका मात्र आश्चर्यकारकरीत्या बचावली आहे. दरम्यान, शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी तारेच्या कुंपणात सोडलेल्या वीज प्रवाहामुळे ही घटना घडली. संबंधित शेतकऱ्याने घेतलेली वीज जोडणी अनधिकृत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर अनधिकृत वीज जोडणी आणि यंत्रणेशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (वय ३५), त्याची पत्नी सुमन (वय ३०), मुले पत्तन (४), कवल (३) आणि विकास याची सासू (सर्व रा. ओसरणी, जिल्हा बन्हाणपूर, मध्य प्रदेश) याचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी येथील शेतकरी बंडू युवराज पाटील (६४) यांनी आपल्या शेतात मका पेरला आहे. रात्री अपरात्री रानडुकरे शेतातील पिके नष्ट करीत असल्याने त्यांनी शेतीला तारेचे कुंपण केले असून पिकात वन्यप्राणी येऊ नये, यासाठी या तारांमध्ये वीज प्रवाह सोडला होता.
विकास हा परिवारासह मंगळवारी रात्री या शेताच्या बाजूला असलेल्या पायवाटेने जात होता. त्याचवेळी या तारेच्या कुंपणाला त्यांचा धक्का लागला आणि पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी शेतमालक बंडू युवराज पाटील हे शेतात गेले असता त्यांना हे हृदयद्रावक दृश्य दिसले, त्यांनी तत्काळ ही बाब लागलीच एरंडोल पोलिसांना कळवली. त्यानंतर दुपारी पाचही मृतदेह जळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तिथे शवविच्छेदन करण्यात आले.
दरम्यान, संबंधित शेतकऱ्याने घेतलेली वीज जोडणी अनधिकृत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यावर अनधिकृत वीज जोडणी आणि यंत्रणेशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासंबंधीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच विजेचा धक्का लागताच वीज प्रवाह बंद होत नाही, अशी माहिती महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.