---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात एका पाच महिन्यांच्या गर्भवतीने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रतीक्षा चेतन शेळके (वय २२) असे मयत विवाहितेचे नाव आहे. गर्भपातासाठी सासरच्यांकडून सतत दबाव टाकला जात असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही महिलेने हाच आरोप केला आहे.
चाळीसगावच्या खाजोळा येथे सासर व शिरसोली येथे माहेरी आलेल्या प्रतीक्षाने गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आई-वडील शेतात गेले असताना, घरी कोणीही नसताना, घरातच गळफास घेतला. शेतातून परतल्यानंतर वडील भागवत धामणे यांनी दरवाजा आतून बंद असल्याचे पाहिले. त्यांनी आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये प्रतीक्षा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. वडिलांनी तातडीने प्रतीक्षाला खाली उतरवून जिल्हा शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.
दीड वर्षांपूर्वी झाला होता विवाह
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रतीक्षाचा विवाह दीड वर्षापूर्वी चेतन शेळके याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर ती पतीसोबत पुणे येथे राहत होती. गेल्या एका महिन्यापासून ती शिरसोली येथे माहेरी आली होती.
चिठ्ठीतून उघडकीस आले कारण
प्रतीक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यात तिने गर्भपातासाठी पती, सासू, सासरे, मावस सासू आणि मावस सासऱ्यांकडून दबाव टाकला जात असल्याचे म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून आणि होणाऱ्या मारहाणीमुळे ती तणावात होती, ज्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले, असेही तिने चिठ्ठीत स्पष्ट केले आहे.
प्रतीक्षाच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरकडील मंडळी तिला सतत त्रास देत होती आणि गर्भपात करण्यासाठी दबाव आणत होती. याच त्रासाला कंटाळून तिने हे कृत्य केले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, पुढील तपास सुरू आहे.