मुंबई : राज्यात जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. महाराष्ट्रात दररोज सरासरी ७० महिला बेपत्ता होत आहेत, अशी धक्कादायक आकडेवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी विधानसभेत सादर केली. या मुद्द्यावरून आज विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील महिला बेपत्ता हे प्रकरण जोरदार गाजले.
आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी सरकार विरोधात घोषणा दिल्या. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, आमदार सतेज पाटील, आमदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधी पक्षांतील आमदार उपस्थित होते. ‘राज्यातील महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता’,अशा घोषणा देण्यात आल्या.
देशमुख म्हणाले की, राज्यातील बेपत्ता होणाऱ्या महिला व मुलींची संख्या अत्यंत धक्कादायक आहे. जानेवारी २०२३ ते मे २०२३ या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यात ५ हजार ६१० महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी मार्च महिन्यात जवळपास २२०० जणी बेपत्ता झाल्या आहेत. पुणे शहरात बेपत्ता होणाऱ्या मुली व महिलांची संख्या सर्वाधिक आहे. बेपत्ता महिलांची ही आकडेवारी लक्षात घेऊन स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून या विषयावर सभागृहात सविस्तर चर्चा घडवून आणण्याची मागणीही देशमुख यानी केली.