चाळीसगाव : भरधाव फॉर्च्यूनरने टाटा नेक्सान कारला दिलेल्या धडकेत पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला तर गाडीतील विवाहिता जखमी झाली. हा अपघात चाळीसगाव-धुळे महामार्गावरील पुन्शी खडी क्रशर प्लॉटपुढे मंगळवारी (१ एप्रिल) सायंकाळी पावणेसहा वाजता घडला. देवांश दिनेश महाजन (५, टिटवाळा, पूर्व कल्याण) असे मयताचे नाव आहे.
डॉ. उत्तमराव महाजनांविरोधात गुन्हा दिनेश देवराम महाजन (४५, टिटवाळा, पूर्व कल्याण) यांनी दोन दिवसांपूर्वी नवी टाटा नेक्सॉन कार घेतल्यानंतर कामानिमित्त ते पत्नी व मुलांसह धुळे येथे गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांच्या कारला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्यूनर (एम. एच. १८- बी.एक्स.००११) ने जबर धडक दिली.

यात कारमधील पाच वर्षीय देवांश हा गाडीबाहेर फेकला जाऊन मयत झाला, तर गाडीमधील स्वाती दिनेश महाजन यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ गंभीर दुखापत झाली. दिनेश महाजन यांच्या नव्या कोऱ्या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अपघाताची माहिती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुले व ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी गेले.
जखमींना उपचारार्थ ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिनेश महाजन यांच्या फिर्यादीवरून डॉ. उत्तमराव महाजनांविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण करीत आहेत.