महाराष्ट्रातील या गावांमध्ये फडकला कर्नाकटचा झेंडा

अक्कलकोट : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटसह जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारमध्ये सीमावाद वाढला आहे. दुसरीकडे सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकार कोणतेही सुविधा देत नाहीत, अशी भावना जनमाणसात निर्माण झाली आहे. याचं कारण म्हणजे, आता अक्कलकोट तालुक्यातील तडवळ भागातील २३ गावोपाठोपाठ उडगी येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव घेण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी ग्रामस्थांनी कर्नाटकाचे झेंडे हातात घेऊन जय कर्नाटकच्या घोषणा दिल्या.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील महाराष्ट्रातील नागरिकांना वीज, पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, युवकांना रोजगार यापासून वंचित राहावे लागत आहे. या उलट कर्नाटक राज्य सरकारने शेतकर्‍यांना मोफत वीज, उसाला वाढीव दर, शेतीसाठी पाणी, हमी भाव, खते, बियाणे, शेतीसाठी अवजारे, डिझेल-पेट्रोल इत्यादी माफक दरात उपलब्ध करून दिली जाते, अशी भावना सीमवर्ती भागातील नागरिकांच्या मनात प्रबळ होत चालली आहे.

कर्नाटक व महाराष्ट्र सीमाभागातील नागरिकांना महाराष्ट्र सरकारने उजनीचे पाणी देतो म्हणून गेली ४० वर्षांपासून राजकारण करीत आहे. उजनी पाण्याचे गाजर दाखविण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी केले आहे. महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील भागातील वंचित गावांना झुलवत ठेवले आहे. शेतकर्‍यांचा फक्त मतदानासाठी वापर करुन घेतला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मोठा रोष पहायला मिळत आहे.