तरंगते दवाखाने नादुरुस्त अवस्थेत नर्मदेच्या किनारी; आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

धडगाव : नर्मदा नदीकाठावरील गावांमध्ये आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून बार्जद्वारे तरंगते दवाखाने सुरू केले; परंतु, आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे हे दवाखाने नादुरुस्त होऊन किनाऱ्यावर लागले आहे.

शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून स्पीड बोटद्वारे वॉटर अॅम्ब्युलन्सची निर्मिती केली आहे. ती देखील गेल्या डिसेंबर महिन्यापासून ते मेपर्यंत बंद होती. गेल्या काही दिवसांपूर्वीच स्पीड बोटची दुरुस्ती करण्यात आली; परंतु आरोग्य कर्मचाऱ्याच्या अभावामुळे नदीकाठावरील आठ ते दहा गावांतील नागरिकांना आरोग्याच्या सेवा मिळत नसल्याचे विदारक चित्र आहे.

नर्मदा काठावरील ४० गावांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी युरोपियन कमिशनच्या सहयोगाने अक्कलकुवा तालुक्यात एक तर, धडगाव तालुक्यात दोन, असे एकूण तीन तरंगत्या दवाखान्यांची निर्मिती करण्यात आली. परंतु २०२१ पासून यापैकी मनीबेली येथे एक दवाखाना अडगळीत पडला आहे.

त्यानंतर दोन्ही दवाखाने बंद पडले आहेत. शासन आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत असले तरी, दुर्गम भागात कर्मचाऱ्यांच्याअभावी आरोग्य सेवा खिळखिळी झाली आहे.

कर्मचारी नसल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे वास्तव आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेले तरंगते दवाखाने दुरुस्त करून वॉटर अॅम्ब्युलन्सवर कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.