जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने राज्याच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची पुनर्रचना नुकतीच करण्यात आली. ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेता विजय गोखले यांची अध्यक्षपदी निवडी झाली. राज्यभरातून विविध जिल्ह्यातील 36 अशासकीय सदस्यांची या मंडळावर निवड करण्यात आली आहे. त्यासंबंधी नुकताच शासन निर्णय काढण्यात आला.खानदेशातील सुप्रसिद्ध शाहीर व नाट्य, पथनाट्य कलावंत तसेच खानदेश लोककलावंत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद दिगंबर ढगे यांची या मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने खानदेशातील लोककलावंताला मिळालेला एक विशेष बहुमान आहे.
खान्देशातील जळगाव व धुळे विभागातून जळगाव जिल्ह्यासाठी नाट्यकर्मी विश्वनाथ निळे यांची, तर धुळे जिल्ह्यासाठी विनोद ढगे यांची या मंडळावर निवड करण्यात आली. जळगाव व धुळे येथील हौशी नाट्य कर्मींना नाट्य सादरीकरणात येणार्या विविध अडचणी स्थानिक स्तरावरच सोडविण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असून, खानदेशातील लोप पावत चाललेल्या लोककला मौखिक परंपरा शाहीर, तमाशा, गोंधळ, वाघ्या मुरळी, भारुड, लोकगीते आदी लोकसाहित्य फारशे प्रकाशित स्वरुपात नाही तथा या लोककलावंताजवळ असलेल्या लोककला लोकसाहित्याला शासनाच्या या मंडळाच्या माध्यमातून परिनिरीक्षण करून त्याचा संचित ठेवा जतन व संवर्धन करून लोककलेच्या क्षेत्रात कार्यरत युवा पिढीला कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शाहीर विनोद ढगे यांनी सांगितले