Pune News : ‘चापट मारत उचलून जमिनीवर आपटलं’, माजी नगरसेवकाची दादागिरी; अखेर गुन्हा दाखल

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांच्यावर एका व्यक्तीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर झाले. या घटनेवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, यावर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

शनिवारी एका वादावरून बाबुराव चांदेरे यांनी विजय रौंदळ या व्यक्तीला चापट मारत उचलून जमिनीवर आदळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या मारहाणीत रौंदळ यांना डोक्याला आणि गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. यावेळी चांदेरे यांनी व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीलाही दमदाटी केल्याचे समोर आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “मी व्हिडिओ पाहिला आणि मला हे अजिबात पटले नाही. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार दिलेला नाही. मी बाबुराव चांदेरे यांना फोन केला, पण त्यांनी तो डायव्हर्ट केला होता. त्यांच्या मुलाशी बोलून मी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचे वर्तन मी सहन करणार नाही. ज्या व्यक्तीला मारहाण झाली आहे, त्याने तक्रार दिली तर कायदेशीर कारवाई होईलच.”

पोलिसांकडून तपास सुरू

मारहाणीत जखमी झालेल्या विजय रौंदळ यांची वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे. ही घटना समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, पक्षाच्या प्रतिमेवरही ताण निर्माण झाला आहे.