जळगाव : बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त होत आहे. अशातच अशीच एक घटना जळगावच्या कानसवाडा येथे आज शुक्रवारी (२१ मार्च) रोजी सकाळी ८ वाजता घडली. शिवसेनेचे (शिंदे गट) माजी उपसरपंच युवराज कोळी (वय ३६) यांची गावातील तिघांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. यामुळे प्रचंड खळबळ उडाली असून, आता या हत्येचं कारण समोर आलं आहे.
कानसवाडा गावातील तिघांनी आज, शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे (शिंदे गट ) माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात चाकू आणि चॉपरने वार करण्यात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर कोळी यांचा मृतदेह जळगाव शासकीय व वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. या वेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला.
या प्रकरणी कानसवाडा गावात तणावाचे वातावरण झाले असून, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांकडून होत आहे. दरम्यान, पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहे.
काय आहे कारण
मिळालेल्या माहितीनुसार, युवराज कोळी यांचा गुरुवार, २० रोजी रात्री चार ते पाच जणांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर त्यांची आज शुक्रवारी (२१ मार्च) रोजी सकाळी ८ वाजता गावातील तिघांनी चाकू आणि चॉपरने वार करून हत्या केली. घटना घडली तेव्हा काही शेतकरी तिथे उपस्थित होते. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी कोळी यांच्यावर वार करुन पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.