पुणे : महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा दुपारपासून बेपत्ता असून, त्याच्या अपहरणाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिसांकडून वेगाने तपास सुरू आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नऱ्हे परिसरातून तानाजी सावंत यांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. तो आपल्या घराजवळून कार्यालयाकडे जात असताना ही घटना घडली. स्वीफ्ट कारमधून त्याचे अपहरण करण्यात आल्याचा संशय आहे. अपहरणाच्या शक्यतेने पुणे पोलिसांकडून संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नऱ्हे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली आहे. तसेच, कात्रज येथील सावंत कुटुंबीयांच्या निवासस्थानी काही पोलिस अधिकारी दाखल झाले असून, त्यांनी कुटुंबीयांची माहिती घेतली आहे.
तानाजी सावंत यांच्या मुलासोबत आणखी कोणी होते का? त्याने शेवटचं कोणासोबत संवाद साधला? अपहरणकर्त्यांनी कोणता मार्ग वापरला? या सर्व बाबींवर पोलिस लक्ष केंद्रित करत आहेत. पुणे पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनाही या प्रकरणाच्या तपासात सहभागी करण्यात आले आहे.
या अपहरणामागे कोणतेही राजकीय किंवा कौटुंबिक कारण आहे का, याचाही पोलिस तपास घेत आहेत. सावंत कुटुंबीयांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची फिर्याद दाखल करण्यात आली नसली, तरी पोलिस स्वतःहून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आहेत.
पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी केली असून, महामार्गांवरही तपासणी सुरू आहे. लवकरच अधिकृत माहिती पोलिसांकडून दिली जाण्याची शक्यता आहे.