विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान माजी गृहमंत्र्यांचं निधन

मेघालय : विधानसभा निवडणुकीदरम्यान खासी हिल्स जिल्ह्यातील सोहियोंग विधानसभा जागेवरील युनायटेड डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि राज्याचे माजी गृहमंत्री एचडीआर लिंगडोह यांच आकस्मिक निधन झालं आहे. दरम्यान, यामुळे येथील निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली जाऊ शकते, असे मुख्य निवडणूक अधिकारी एफआर खारकोनगर यांनी सांगितले.

एचडीआर लिंगडोह हे निवडणूक प्रचारादरम्यान अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथं त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री संगमा यांनी शोक व्यक्त केला आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचं स्मरण केलं.

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लिहिलं की, ‘ज्येष्ठ नेते एचडीआर लिंगडोह यांच्या आकस्मिक निधनानं मला खूप दु:ख झालंय. लिंगडोह यांनी गेल्या काही वर्षांत अनेक पदं भूषवली आहेत. त्यांच्या निधनानं मेघालयचं मोठं नुकसान झालंय. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.’

दरम्यान, मेघालयमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत, त्यापैकी 59 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. मेघालयसोबतच नागालँडमध्येही 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड निवडणुकांचे निकाल 2 मार्चला लागणार आहेत. त्रिपुरातील सर्व 60 जागांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान झालं होतं.