नवी दिल्ली: दोन माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि श्रीसंत लिजेंड्स लीग क्रिकेटमधील लाइव्ह सामन्यादरम्यान भिडले. बुधवारी, सुरतमध्ये या लीगच्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्सचे संघ आमनेसामने होते. गंभीर कॅपिटल्सचा कर्णधार आहे, तर श्रीसंत गुजरातचा गोलंदाज आहे. या सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीशांत यांच्यात शाब्दिक लढाई झाली. इतकंच नाही तर मॅचनंतर श्रीसंतने X (पूर्वीचे ट्विटर) वर एक व्हिडिओ पोस्ट करत गंभीरवर निशाणा साधला आणि मोठे खुलासे केले. गंभीरच्या कथित वाईट वागणुकीमुळे तो इतका संतापला होता की, त्याला व्हिडिओ पोस्ट करावा
नेमके भांडण कशामुळे झाले?
या सामन्यादरम्यान गुजरातचा कर्णधार पार्थिव पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्क एडवर्ड्स आणि गंभीर इंडिया कॅपिटल्ससाठी सलामीला आले. ३० चेंडूत ५१ धावांच्या खेळीत कॅपिटल्सचा कर्णधार गंभीरने श्रीसंतच्या गोलंदाजीवर काही चौकार मारले. यानंतर श्रीसंतने निराशेने गंभीरकडे पाहत काही शब्द बोलल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. याला प्रत्युत्तर म्हणून गंभीरने या वेगवान गोलंदाजाकडे रोखून हातवारे केले. हा वाद इथेच थांबला नाही. कॅपिटल्सचा फलंदाज बाद होताना एका चाहत्याने स्टँडवरून रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या ब्रेकदरम्यान गंभीर आणि श्रीसंतमध्ये पुन्हा वादावादी झाली असे श्रीसंतचे म्हणणे आहे.
गौतम गंभीर आणि एस श्रीसंत या दोघांची आक्रमक वृत्ती निवृत्तीनंतरही कायम आहे. गुजरातमधील सुरत येथे लिजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान दोघेही एकमेकांशी भांडले. या वादाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
श्रीसंतने पोस्ट केला व्हिडिओ
गंभीरने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. तो त्याच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. कॅपिटल्सने २० षटकांत सात गडी गमावून २२३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ २० षटकांत ७ गडी गमावून २११ धावाच करू शकला. सामना संपल्यानंतर, जेव्हा कॅपिटल्सने जायंट्सला पराभूत करून क्वालिफायर २ मध्ये स्थान निश्चित केले, तेव्हा श्रीसंतने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने गंभीरला लक्ष्य केले आणि काही आरोप केले आहेत.
श्रीसंतने गंभीरवर केले मोठे आरोप
या व्हिडिओमध्ये श्रीसंत असे म्हणताना ऐकू येत आहे – मिस्टर फायटरसोबत काय घडले याबद्दल मला काही स्पष्ट करायचे होते. मिस्टर फायटर विनाकारण त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी भांडतो. तो त्याच्या वरिष्ठ खेळाडूंचा वीरू भाई (वीरेंद्र सेहवाग)सह अनेक खेळाडूंही आदर करत नाही. नेमकं तेच झालं. मी काहीही न बोलता तो मला सतत काही ना काही बोलत राहील जे अत्यंत असभ्य होते. गौतम गंभीरने असे बोलायला नको होते.’
श्रीसंत म्हणाला, गंभीरने बोललेल्या या शब्दांमुळे त्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे मन दुखावल्याचे त्याने सांगितले. माजी वेगवान गोलंदाज म्हणाला, ‘माझी काहीच चूक नाही. त्याने वापरलेले शब्द आणि क्रिकेटच्या मैदानावर तो बोललेल्या गोष्टी स्वीकार्य नाहीत. मी माझ्या कुटुंबासह खूप काही सोसले आहे. तुमच्या पाठिंब्याने मी एकट्याने ती लढाई लढली आहे. आता काही लोकांना विनाकारण माझा अपमान करायचा आहे. गंभीरने मैदानात अशा गोष्टींचं उल्लेख केला जे त्याने बोलणे अपेक्षित नव्हते.