जळगाव : जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना राजकीय वातावरण तापले आहे. पक्षांतरे सुरूच असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. पाचोरा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नुकतीच जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, लवकरच त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
दिलीप वाघ यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत घनिष्ठ संबंध आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राजकीय कारकीर्द घडवली. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढवली. तेव्हापासून ते पक्षावर नाराज होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दिलीप वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या आपल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. त्यांच्या या प्रवेशामुळे भाजपला जिल्ह्यात आणखी बळकटी मिळणार आहे.
माजी आमदार दिलीप वाघ आणि त्यांचे बंधू संजय वाघ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्या समर्थकांचाही मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणांवर होणार परिणाम?
दिलीप वाघ यांच्या भाजप प्रवेशामुळे पाचोरा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पवार गटाला या प्रवेशामुळे मोठा धक्का बसू शकतो, तर भाजपला जिल्ह्यातील संघटनात्मक बळ वाढवण्यास मदत होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या बदलाचा मोठा परिणाम दिसून येऊ शकतो.