भुसावळ : ले आऊट एन ए करण्यासाठी एक कोटींची खंडणी मागून सुरूवातीला 15 लाखांची रक्कम स्वीकारल्याप्रकरणी भुसावळातील माजी आमदार संतोष छबीलदास चौधरी यांना जुलै 2011 मध्ये जळगाव एलसीबीने ट्रॅप करीत अटक केली होती. या गुन्ह्यात चौधरींसह पाच संशयीतांचा समावेश होता. जळगाव सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर माजी आमदार चौधरी यांना केसच्या काळात जामीन मिळाला नसल्याने दोन वर्ष 19 दिवस त्यांनी शिक्षा भोगली व शिक्षे विरोधात त्यांनी अपिल केल्यानंतर बुधवार, 5 एप्रिल रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी माजी आमदार चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान, चौधरी यांची खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्तता झाल्याने आगामी काळात त्यांना सर्व निवडणुका लढण्याचा मार्ग मोकळा झाला असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.
असा आहे खंडणी प्रकरणाचा इतिहास
भुसावळातील बांधकाम व्यावसायीक चंद्रशेखर अत्तरदे यांच्या सर्वे क्रमांक 78 या जमिनीचा ले आऊट ‘एनए’ करण्यासाठी माजी आमदार चौधरींनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती व सुरूवातीला लाचेतील 15 लाख रुपये राष्ट्रवादी कार्यालयात स्वीकारल्याचा आरोप होता. जळगाव गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक डी.डी.गवारे, स्व.वाय.डी.अण्णा पाटील आदी अधिकार्यांच्या काळात हा सापळा यशस्वी करण्यात आला. या गुन्ह्यात रामदास सावकारे, बबलू सोनवणे, सुलेमान तडवी, अभियंता शेख यांनादेखील सहआरोपी करण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अभियंता शेख यांचे निधन झाले तर सुलेमान तडवींसह बबलू सोनवणे यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती मात्र चौधरी दोन वर्ष 19 दिवस कारागृहात असल्याने त्यांनी या शिक्षेविरोधात जळगाव जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायालयात अपिल दाखल केले तर सरकार पक्षानेदेखील चौधरींना अधिक शिक्षा मिळण्याबाबत अपिल दाखल केले. दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद चालला तर तब्बल 13 वर्षानंतर चौधरींविरोधात आरोप सिद्ध न झाल्याने त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली. बुधवार, 5 एप्रिल रोजी सत्र न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी हा निकाल दिल्याची माहिती अॅड.सागर चित्रे यांनी ‘दैनिक तरुण भारत’शी बोलताना दिली. दरम्यान, माजी आमदार चौधरी म्हणाले की, न्याय देवतेवर आपला पूर्ण विश्वासं होता व आपल्याला न्याय मिळाला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये वाढला उत्साह
माजी आमदार चौधरी यांनी शिक्षा भोगल्याने त्यांना कुठल्याही निवडणुकीत सहभागी होता येत नव्हते मात्र आता चौधरी यांची निर्दोष सुटका झाल्यानंतर त्यांच्यासह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दुणावला आहे. आगामी जिल्हा परीषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका पाहता चौधरी आता अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे शिवाय पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे चौधरी हेच उमेदवार राहण्याचीदेखील अधिक शक्यता आहे. चौधरींची निर्दोष सुटका झाल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड उत्साह संचारला आहे हेदेखील तितकेच खरे !