टीम इंडियाचे माजी खेळाडू ‘सलीम दुराणी’ यांचे निधन

तरुण भारत  लाईव्ह । २ एप्रिल २०२३। भारतीय क्रिकेट विश्वातून एक वाईट बातमी समोर येतेय. टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी यांचे रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुजरातच्या जामनगर येथे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचे माजी खेळाडू सलीम दुराणी हे कर्करोगाने ग्रस्त होते. ८८ वर्षांचे दुर्रानी यांची कर्करोगाशी लढत अखेर संपली. गुजरातमधील जामनगरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते ८८ वर्षांचे होते. सलीम दुर्राणी यांचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला होता आणि ते अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळले. यासह दुर्रानी हे अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय क्रिकेटपटू ठरले आहेत.

काबूलमध्ये जन्मलेल्या सलीम दुर्राणी यांनी १ जानेवारी १९६० रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताकडून कसोटीत पदार्पण केले. दुर्रानी यांनी जवळपास १३ वर्षे भारताकडून क्रिकेट खेळले आहे. यादरम्यान, त्यांनी २९ कसोटी सामन्यांमध्ये २५.०४ च्या सरासरीने फलंदाजी करत १२०२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या बॅटने १ शतक आणि ७ अर्धशतके झळकावली. ते एक असे फलंदाज होते जो चाहत्यांच्या मागणीनुसार षटकार ठोकत असतं.

सलीम दुर्राणी त्यांच्या जबरदस्त लुक्ससाठीही ओळखले जात होते. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. १९७३ मध्ये सलीम यांनी चरित्र नावाच्या चित्रपटात काम केले. त्या चित्रपटात दुर्रानी यांनी तत्कालीन स्टार अभिनेत्री परवीन बाबीसोबत काम केले होते. याशिवाय सलीम यांना २०११ मध्ये बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.