नवी दिल्ली : काही महिन्यापूर्वी मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्या प्रकरणी वाद सुरू झाला होता. यानंतर भारतीयांनीमालदीववर बहिष्कार टाकला होता. यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांनी मालदीवच्या लोकांच्या वतीने भारतीयांची माफीही मागितली आणि भारतीय पर्यटकांनी आपल्या देशात येत राहावे अशी माझी इच्छा आहे, असं म्हटले आहे.
मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद सध्या भारतात आहेत. दोन्ही देशांमधील तणावाबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी भारताने मालदीववर बहिष्कार टाकण्याच्या आवाहनाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याचा परिणाम आपल्या देशातील पर्यटन क्षेत्रावर झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालदीवच्या जनतेच्या वतीने त्यांनी माफीही मागितली.
मालदीववर बहिष्काराचा खूप मोठा परिणाम झाला आहे, आणि मला त्याबद्दल खरोखरच काळजी वाटते. मला आणि मालदीवच्या लोकांना खेद वाटतो, असे मला म्हणायचे आहे. माजी राष्ट्रपतींनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि ते म्हणाले, “मी काल रात्री पंतप्रधानांची भेट घेतली. पीएम मोदींनी आम्हा सर्वांना शुभेच्छा दिल्या. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा समर्थक आहे आणि मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतो.