आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेसच्या वाटेवर!

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) चे माजी गव्हर्नर रघुराम राजन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाले आहेत. भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये पोहचली आहे. राजस्थानातील सवाई माधोपुर येथील भदौतीमध्ये रघुराम राजन या यात्रेत सामील झाले. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन रघुराम राजन यांचा राहुल गांधींसोबतचा ‘भारत जोडो’ यात्रेतील फोटो ट्विट करण्यात आला आहे. यामुळे रघुराम राजन हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रघुराम राजन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. नोटाबंदीपासून आरबीआयच्या धोरणांपर्यंत सर्वच बाबतीत राजन हे सडकून टीका करतात. ते नरेंद्र मोदी यांचे विरोधक म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांना काँग्रेस नेहमीच पाठिबा देत असते. ते काँग्रेस समर्थक असले तरी त्यांनी आतापर्यंत काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावली नव्हती. मात्र आता ते प्रथमच काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत.

रघुराम राजन यांनी भारत जोडो यात्रेत हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. ते लवकरच काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करतील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन ट्विट करण्यात आलेल्या फोटोला, द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी लोकांची संख्या वाढत आहे. ही वाढती संख्या आपण यशस्वी होऊ हे दर्शवत आहे, असं कॅप्शनही या फोटोला देण्यात आलं आहे.