लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील सपाने राष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवला आहे. सपाच्या स्थापनेपासूनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अखिलेश यादव आता लोकसभेतील संख्येच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या सपाला राष्ट्रीय ओळख, म्हणजेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील ताकद सपा आता मुंबईत दाखवणार आहे. त्यासाठी समाजवादी पक्षाचे खासदार शुक्रवारी मुंबईत दाखल झाले आहे. 37 पैकी सपाचे 25 खासदार मुंबईत आले असून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामाध्यमातून अबू आझमी मुंबईत आपले सामर्थ्य दाखवणार आहे. यामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मतदार समाजवादी पक्षाकडे आकर्षित होणार आहे.
महाराष्ट्रात सपाचा पीडीएचा फॉर्म्युला
उत्तर प्रदेशातील सपा खासदारांचे मुंबईत स्वागत करण्याच्या कार्यक्रमासोबतच अखिलेश यादव यांचा पीडीएचा फॉर्म्युला लागू करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. अर्थात मुंबईतून दलित, मागासवर्गीय आणि मुस्लिमांना राजकीय संदेश देण्याची योजना सपाने आखली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पीडीएच्या फॉर्म्युल्याद्वारे विजय मिळवण्यात सपाला यश आले असून, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही त्याचीच अंमलबजावणी करण्याची रणनीती त्यांनी आखली आहे.
सपाचे लक्ष्य महाविकास आघाडी
सपा खासदाराच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन महाविकास आघाडीवर दबाव बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सपाला इंडिया आघाडीतून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी यांच्यावर दबाव निर्माण करण्याची ही रणनीती आहे. राज्यातील ज्या ज्या भागांमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या जास्त आहे, त्याठिकाणी सपाचे उमेदवार देण्याची मागणी अबू आझमी करणार आहे.
तसेच मुंबईसारख्या ठिकाणी उत्तर भारतीयांना सपाकडे खेचण्याचे धोरण आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत सपाचे 2 आमदार निवडून आले होते. आता त्यापेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. अबू आझमी प्रदीर्घ काळपासून महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्षाचे अनेक नेते आमदार, खासदार निवडून आले. त्यानंतर बहुतांश लोकांनी पक्ष सोडला. माजिद मेनन, नवाब मलिक, युनूस अब्राहानी, वसीर पटेल, सोहेल लोखंडवाला, अस्लम शेख, हुसैन दलवाई, मोहसीन हैदर, अशरफ आझमी यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत, ज्यांनी सपामधून आपल्या राजकारणाची सुरुवात केली. परंतु नंतर सर्वांनी पक्ष सोडला. पण अबू आझमी अजूनही समाजवादी पक्षाचे प्रमुख आहेत. आता पक्ष फुटी नये, ही खबरदारी अबू आझमी घेत आहेत.