धुळे : नंदुरबार येथील एका शिक्षकाला निर्वस्त्र करून अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत १२ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या चौघांना धुळे गुन्हे शाखेने अटक केली आहे. फेसबुकच्या माध्यमातून शिक्षकाशी मैत्री करून त्याला धुळ्यात बोलावून हा कट रचण्यात आला होता.
हेही वाचा : 36 वर्षीय महिलेचं 15 वर्षीय मुलावर जडलं प्रेम; लग्नासाठी पळालेही, पण…
धुळे शहरातील एका तरुणीने फेसबुकवर नंदुरबारच्या एका शिक्षकाशी मैत्री केली. मैत्री घट्ट झाल्यावर तिने शिक्षकाला धुळे येथे भेटीसाठी बोलावले. १२ जानेवारी रोजी शिक्षक तरुणीच्या घरी पोहोचले. यानंतर तरुणीने अंगावरील कपडे काढून शिक्षकाला गोंधळात टाकले. त्याचवेळी तिच्या साथीदारांनी छापा टाकल्याचे नाटक करून शिक्षकाचा निर्वस्त्र व्हिडिओ बनवला. शिवीगाळ करून १२ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आणि शिक्षकाचा मोबाईल हिसकावून घेण्यात आला.
शिक्षकाने धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार यांना घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी नंदुरबार शहरात सापळा रचला. चौघे आरोपी कारमधून आले, तेव्हा तक्रारदार शिक्षकही कारमध्ये बसले. त्याच वेळी पोलिसांनी छापा टाकत चौघांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी
देवेश दीपक कपूर (१९, तिरुपती नगर, देवपूर, धुळे)
हितेश ज्ञानेश्वर बिन्हाडे (१९, तिरुपती नगर, देवपूर, धुळे)
हर्षल गोपाल वाघ (२१, भगवा चौक, रावेर, जि. धुळे)
विनय देवानंद नेरकर (२३, फॉरेस्ट कॉलनी, देवपूर, धुळे)
या चौघांसह धुळे शहरातील तरुणीविरोधात देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा उघडकीस कसा आला?
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. या पथकात वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार मायूस सोनवणे, संदीप पाटील, पंकज खैरमोडे, चेतन बोरसे आणि चालक संजय सुरसे यांचा समावेश होता. या प्रकरणाने धुळे शहरात खळबळ उडाली असून याआधीही संबंधित टोळीने इतरांना ब्लॅकमेल केल्याचे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.