---Advertisement---
भुसावळ, प्रतिनीधी : पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे फलकावरून प्रवाशाची अंदाजे २० लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅग चोरी करून फरार झालेल्या भुसावळ येथील चोघांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून दीड लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
लोहमार्ग पोलीस ठाण्यातील माहितीनुसार, १६ ऑक्टोबर रोजी एक प्रवासी रेल्वे फलकावर उभा असताना चार अनोळखी इसमांनी त्याच्याकडील २० लाख रुपये रोकड असलेली ट्रॅव्हलिंग बॅग चोरून नेली.या प्रकरणी प्रवाशाने लोहमार्ग पोलीस ठाणे, पुणे येथे गु.र.नं. ४३४/२०२५ अंतर्गत भा.दं.सं. कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयितांचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान गुन्ह्यातील चार संशयितांची ओळख पटली.पोलिसांनी कारवाई करत आलू ऊर्फ हरिष शर्मा यास नागपूर येथून, वसीम सैय्यद व कलीम शेख या दोघांना अजमेर येथून, तसेच तस्लीम शेख यास श्रीरामपूर (अहिल्यादेवी नगर) येथून अटक केली.सर्व आरोपी भुसावळ येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयितांकडून दीड लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली असून उर्वरित रक्कम व इतर पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रनवरे करीत आहेत.









