‘या’ कारणामुळे काँग्रेसचे मित्रपक्ष भारत जोडो यात्रेपासून चार हात लांब

नवी दिल्ली : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आल्यानंतर यात्रेपासून काँगे्रसच्या मित्रपक्षांनी चार हातचे अंतर राखले आहे. राहुल गांधींना ज्याप्रकारे दक्षिण भारतात विरोधी आणि मित्र पक्षांची साथ मिळाली त्याप्रमाणे उत्तर भारतात मात्र त्यांना साथ मिळताना दिसलेली नाही. उत्तर प्रदेशमध्ये भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विरोधी पक्षांमधील अखिलेश यादव आणि मायावतींसह सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण पाठवले होते. तसेच बिहारमधील जेडीयू आणि आरजेडीसह सर्व पक्षांना निमंत्रित केले होते.

मात्र उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कुठल्याही मोठ्या पक्षाचा बडा नेता भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होताना दिसत नाही आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तर भारत जोडो यात्रा ही काँग्रेसचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. तर लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीनेही या यात्रेत सहभागी होण्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

उत्तर प्रदेशामध्ये सपा, बसपा, आरएलडी एकेकाळच्या व्होटबँकेच्या मदतीने राजकारणात महत्त्वाच्या भूमिकेपर्यंत पोहोचले आहेत. तर बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू आणि डाव्या पक्षांनाही याच व्होटबँकेचा आधार आहे. मात्रा आता भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे ही व्होटबँक पुन्हा काँग्रेसकडे सरकेल. अशी काँग्रेसच्या मित्रपक्षांना भीती आहे.

२०२४ मध्ये मोदींसमोर विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून उबे राहण्यासाठी नितीश कुमार, अरविंद केजरीवाल, केसीआर, ममता बॅनर्जी आदी नेते प्रयत्नशील आहेत. ममता बॅनर्जी आणि केसीआर कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसला विरोधी गटाचं नेतृत्व करू देणार नाहीत. तर अखिलेश आणि मायावती यांनीही आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व पक्ष भारत जोडो यात्रेपासून दूर आहेत.