तरुण भारत लाईव्ह । २८ जानेवारी २०२३। भुसावळ शहरातील खानकाजवळील चिराग हॉलमागे बहारे मदिना मशिदीजवळील चार राहत्या बंद घराचे कडीकोंडे तोडून रोकड व सोन्या-चांदीचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीला घरफोडी व चोरी करून पसार झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
भाडेकरूचेही घर फोडले
शहरातील खानकाजवळील चिराग हॉलमागील बहारे मदिना मशीदजवळील रहिवासी मोहम्मद आशिक मोहम्मद हनीफ पिंजारी (ह.मु.जुना सातारा, बागवान हल्ली, भुसावळ) यांच्या बंद घरासह सरफराज गवळी यांच्या घरात भाड्याने राहत असलेले भाडेकरू इमरान शाह इकबाल शाह, इब्राहिम सलिम शाह, मोहम्मद इब्राहिम अब्दुल शकील आदींच्या घरी 25 रोजी रात्री आठ ते 26 रोजी सकाळी सहा दरम्यान चोरट्यांनी संधी साधून 10 ग्रॅम वजनाच्या व 46 हजार रुपये किंमतीच्या अंगठ्या, एक ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी, लहान मुलांच्या हातात घालण्याची चार हजार 600 रुपये किमतीची मनगटी, पाच हजार रुपये किमतीचे 20 भार चांदीचे दागिने असा 55 हजारांचा ऐवज तसेच इमरान शहा इकबाल शहा यांच्या राहत्या घरातून 13 हजार 800 रुपये किमतीची सोन्याची पोत, सहा ग्रॅम वजनाच्या व एक हजार 200 रुपये किमतीचा अंगठ्या असा एकूण 70 हजार 600 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लांबवला. या प्रकरणी मोहम्मद आशिफ मोहम्मद हनिफ पिंजारी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, घरफोडीची बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सपोनि हरीष भोये, यासीन पिंजारी, गोपाल गव्हाळे आदींनी पाहणी केली. तपास हवालदार जितेंद्र पाटील करीत आहे.