T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने २९ जून रोजी विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत केले. यानंतर भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारतीय संघ गुरुवार, ४ जुलै रोजी मायदेशात पोहचला. यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारकडून टी२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघात असलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
विजयानंतर टीम इंडिया भारतात पोहोचली तेव्हा त्यांनी सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईच्या चार खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यात कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे.
वर्षा या शासकीय निवासस्थानी विश्व विजेत्या टीम इंडियातील 4 खेळाडूंनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली. या सत्कारानंतर हे 4 खेळाडू विधानभवनात जाणार आहेत. विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये सत्कार होणार आहे. त्यासाठी विधानभवनात लोककलाकार जमले आहेत. विधानभवनात मुंबईकर खेळाडूंचं तुतारी वाजवून स्वागत केलं जाणार आहे. तसेच राज्य सरकारने 4 मुंबईकर खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.