दिल्लीकरांना झटका! आजपासून मोफत वीज बंद

नवी दिल्ली : दिल्लीत आजपासून वीज सबसिडी बंद करण्यात आली आहे. यामुळे केजरीवाल यांच्या फ्री मॉडेलला मोठा धक्का बसला आहे. सबसिडी बंद झाल्यानंतर आप सरकारने उपराज्यपालांवर टिका केली आहे. वीज सबसिडी वाढवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय उपराज्यपालांसमोर प्रलंबित आहे, असे सांगत केजरीवाल सरकारमधील ऊर्जा मंत्री आतिशी यांनी व्हीके सक्सेना यांच्यावर आरोप केला आहे.

आतिशी म्हणाल्या की, आम्ही ४६ लाख लोकांना दिलेली वीज सबसिडी आजपासून बंद होणार आहे. सोमवारपासून लोकांना सबसिडीशिवाय वाढीव बिले मिळतील. दिल्ली मंत्रिमंडळाने २०२३-२४ या वर्षासाठी वीज सबसिडी वाढवण्यास मंजुरी दिली आहे, परंतु एलजी कार्यालयात फाइल अद्याप प्रलंबित आहे. जोपर्यंत फाईल मंजूर होत नाही, तोपर्यंत आम्ही अनुदान देऊ शकत नाही.

एलजी कार्यालयाच्या वतीने मंत्री आतिषी यांना एलजीवर अनावश्यक राजकारण आणि खोटे आरोप करू नका, असा सल्ला देण्यात आला आहे. मंत्र्यांनी आपल्या खोट्या वक्तव्याने जनतेची दिशाभूल करणे थांबवावे. १५ एप्रिल अंतिम मुदत असताना उपराज्यपालांकडे फाईल ११ एप्रिलला पाठवली. यानंतर लगेच १३ एप्रिलला पत्र लिहून आज पत्रकार परिषद घेण्याचे नाटक का केले जात आहे. सरकारने आधी याचे उत्तर जनतेला द्यावे, असे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.