तरुण भारत लाईव्ह । चाळीसगाव : तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी ‘मोफत मध्यान्ह भोजन’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ शहरातील पाटणादेवी रोडवरील अहिल्यादेवी चौकासह तालुक्यातील चैतन्य तांडा व ओझर येथे करण्यात आला.
या मध्यान्ह भोजनात भाजी, तीन पोळ्या, वरणभात, लोणचे आणि गोड पदार्थ दिला जातो. कामगारांना सकस व पौष्टिक आहार मिळावा हा या योजनेचा उद्देश आहे. चाळीसगाव तालुक्यात सुरुवातीला दोन हजार कामगारांना हे मध्यान्ह भोजन पुरविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी या मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसेवा कार्यालयाने केले आहे.
या योजनेच्या शुभारंभप्रसंगी भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचे शहराध्यक्ष धर्मराज बच्छे, योगेश पाथरवट, उदेसिंग पवार, समाधान सोनवणे, दिनेश साबळे, राहुल आगोणे, भुरा आगोणे, पिंटू आगोणे, दीपक आगोणे उपस्थित होते. चैतन्य तांडा (ता. चाळीसगाव) येथे सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, सरपंच अनिता राठोड, उपसरपंच आनंद राठोड, सेवानिवृत्त अधिकारी जुलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य भाऊराव चव्हाण, किसन चव्हाण, वसंत राठोड, मधुकर राठोड, उद्धव पवार आदी उपस्थित होते.