एसटी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली मोठी घोषणा

ठाणे : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी २५ बेडचे रुग्णालय आणि मुंबईत बोरिवली येथे १०० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.

एसटी कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार 

हे रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधा देणार आहेत.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या प्रारंभावेळी ठाण्यातील एसटीच्या खोपट आगारात सरनाईक यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेल्या सुविधांचा विचार केला आणि त्यासाठी पुढील योजना स्पष्ट केल्या.

सरनाईक यांनी सांगितले की, बोरिवलीतील आगार पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर विकसित केले जाईल. त्याचप्रमाणे इतर आगार टप्प्याटप्प्याने विकसित केली जातील. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी मोफत जेवणाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जातील.

आगामी महिन्यात गुजरात आणि कर्नाटकमध्ये एसटी सेवा कशी दिली जाते, याची पाहणी करून त्या सुविधांचे राज्यात कसे रूळवता येतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.