---Advertisement---
झी मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून हार्दिक जोशीला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून हार्दिक जोशी हा सातत्याने चर्चेत आहे. हार्दिक जोशी हा लवकरच ‘क्लब 52’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
‘क्लब 52’ या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात कसिनो आणि त्याच्याशी संबंधित कथानकाने होते. त्यानंतर यात चांगली अॅक्शनही पाहायला मिळत आहे. यात हार्दिक जोशी हा जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे. यात काही नवोदित कलाकार असूनही त्यांचा अभिनय उत्तम झाल्याचा दिसतो आहे. “एक डाव नियतीचा” अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरमुळे आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे
नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी यांनी केले आहे. या चित्रपटात हार्दिक जोशी, भाऊ कदम, शशांक शेंडे, भरत ठाकूर, यशश्री व्यंकटेश, टीना सोनी, राधा सागर, नितीन रुपनवार, उमेश बोलके अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.