तरुण भारत लाईव्ह ।२२ मार्च २०२३। छान, सुंदर दिसायला सगळ्यांनाच विशेषतः मुलींना, महिलांना नेहमीच आवडते. त्यासाठी कोणतेही नियम पाळण्याची त्यांची तयारी असते. डाएट किंवा खाण्यापिण्याच्या पथ्यांना त्या नाक मुरडत नाहीत. हे सगळे कशासाठी तर सुंदर दिसण्यासाठी. बरं हे सगळं आताच्या काळातच आहे, असं काही नाही. तर पूर्वीपासून स्त्रिया सौंदर्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करताना दिसतात. तेव्हा प्रामुख्याने नैसर्गिक उपायांना जास्त प्राधान्य दिले जायचे.
आज प्रत्येकजण पिंपल्स, कोरडेपणा किंवा त्वचेशी संबंधित इतर समस्यांनी त्रस्त दिसतो आहे. अशा परिस्थितीत तुम्ही महागडे सौंदर्यप्रसाधने वापरता, पण त्यात मोठ्या प्रमाणात केमिकल असते, ज्यामुळे त्वचेला आणखी नुकसान होऊ शकते. म्हणूनच आम्ही तुम्हाला एका नैसर्गिक उपायाची माहिती देणार आहोत.
त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही जे काही वापरात असाल त्यात तुम्ही मुलतानी मातीचा समावेश करू शकता. तुमचा रंग तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.
तेलकट त्वचेपासून आराम
मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास मदत करतात. यामुळे त्वचेतील घाण साफ होते. तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही मुलतानी फेस पॅक वापरू शकता.
चमकदार त्वचेसाठी उपयोगी
मुलतानी माती चेहऱ्याला आवश्यक पोषक तत्त्व देते. त्यामुळे त्वचेची चमक कायम राहण्यास मदत होते. तसेच यामुळे त्वचेतील रक्ताभिसरणही सुधारते.
मुरुमांपासून सुटका
तुम्ही मुरूम अर्थात पिंपल्सने त्रस्त असाल तर मुलतानी माती तुमच्यासाठी फारच उपयोगी ठरू शकते. याच्या नियमित वापरामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून आराम मिळण्यास मदत होते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम क्लोराईड त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे.
टॅनिंग काढा
सतत उन्हात फिरल्याने तसेच पोहोण्याचा व्यायाम करत असाल तर त्वचा टॅन होते. या टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मुलतानी माती वापरू शकता. यासाठी मुलतानी मातीपासून स्क्रब तयार करता येतो.
मुलतानी मातीचा फेस पॅक कसा बनवायचा
एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती घ्या, त्यात हळद तसेच गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा. साधारण १५ मिनिटांनी साध्या पाण्याने धुवा. तुम्हाला त्वचा तजेलदार झाल्याचे तुमच्या लक्षात येईल.