बेरिल वादळाचं तांडव; २० लाख लोकांना फटका

ह्यूस्टन  : बेरिल चक्रीवादळाने अमेरिकेत कहर केला आहे. २० लाखांहून अधिक लोकांना जोरदार वारा, पुराचा मोठा फटका बसला आहे. वादळानंतर पॉवर ग्रीड प्रभावित झाल्यामुळे, टेक्सासमधील २० लाखांहून अधिक घरं अंधारात आहेत. लुइसियानामध्येही १४ हजार घरं वीजेविना होती. आग्नेय टेक्सासमधील २० लाखांहून अधिक घरातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ती घरं अंधारात होती.

वादळाचे तीव्र स्वरूप पाहता सरकारने सतर्कतेचा इशारा दिला आहे. बेरिल वादळाचा मंगळवारी वेग थोडा कमी झाला होता आणि ताशी ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहून ते उत्तर-पूर्वेकडे कॅनडाच्या दिशेने सरकत होते. यामुळे पूर आणि चक्रीवादळ येऊ शकतं, असा इशारा देण्यात आला आहे. ह्यूस्टनमध्ये २० लाखांहून अधिक लोक राहतात, ज्यांना वादळ, जोरदार वारा आणि पूर यांचा मोठा फटका बसला आहे.

गेल्या आठवड्यातच, बेरिल चक्रीवादळामुळे जमॅका, ग्रेनेडा आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्समध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. हे वादळ सध्या वेगाने ईशान्येकडे सरकत आहे. मंगळवार आणि बुधवारी, लोअर मिसिसिपी व्हॅली आणि नंतर ओहायो व्हॅलीकडे जाण्यापूर्वी ते पूर्व टेक्सासमध्ये त्याचा परिणाम होईल.