नवी दिल्ली : येत्या 1 एप्रिलपासून सुरू होणार्या नवीन आर्थिक वर्ष 2023-24 (FY23) मध्ये अनेक नियम बदलतील, जे सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असतील. नवीन आर्थिक वर्षात आयकराशी संबंधित अनेक नियमही बदलणार आहेत, जे जाणून घेणे करदात्यांसाठी महत्त्वाचे आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनुसार येत्या आर्थिक वर्षात खालील प्रमाणे बदल होणार आहेत.
पगारदारांसाठी टीडीएस मध्ये कपात
पुढील महिन्यापासून पगारदार वर्गाने आयटीआर रिटर्न भरताना नवीन प्रणालीची निवड केल्यास टीडीएस कपात कमी होऊ शकते. अशा करदात्यांना, ज्यांचे करपात्र उत्पन्न ७ लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्यांनी नवीन कर प्रणालीची निवड केली आहे, त्यांना कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही. यासाठी आयकर कायद्याच्या कलम ८७ए अंतर्गत अतिरिक्त सूट देण्यात आली आहे.
भांडवली नफ्यावर अधिक कर
पुढील महिन्यापासून मालमत्तेच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर जास्त भांडवली नफा कर भरावा लागेल. सध्या कलम २४ अंतर्गत दावा केलेले व्याज खरेदी किंवा दुरुस्तीच्या खर्चामध्ये समाविष्ट केले जाणार नाही. यासह मार्केट-लिंक्ड डिबेंचर्सचे हस्तांतरण, पूर्तता किंवा परिपक्वता यातून निर्माण होणारा भांडवली नफा आता अल्पकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल.
सोन्याबाबतही होणार बदल
एप्रिल महिन्यापासून तुम्ही भौतिक सोन्याचे इजीआर किंवा इलेक्ट्रॉनिक सोन्याच्या पावतीचे भौतिक सोन्यात रूपांतर केल्यास, तुम्हाला त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. मात्र, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सेबीच्या नोंदणीकृत व्हॉल्ट व्यवस्थापकाकडून रूपांतरण करावे लागेल.
सूचीबद्ध डिबेंचर्सवर टीडीएस
आयकर कायद्याचे कलम १९३ काही सिक्युरिटीजच्या संदर्भात भरलेल्या व्याजावर टीडीएस सूट देते. तसेच जर सिक्युरिटी डीमटेरियल फॉर्ममध्ये असेल आणि एखाद्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध असेल, तर अशा प्रकरणांमध्ये भरलेल्या व्याजावर टीडीएस कापला जाणार नाही. याशिवाय, इतर सर्व पेमेंटवर १०% टीडीएस कापला जाईल.
ऑनलाइन गेमवर टॅक्स
जर तुम्ही देखील ऑनलाईन गेम खेळून पैसे जिंकत असाल तर आता तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल. आयकर कायद्याच्या नवीन कलम ११५ बीबीजे अंतर्गत अशा पैशांवर ३०% कर आकारला जाईल तर, हा कर टीडीएस म्हणून कापला जाईल.