G-20 शिखर परिषदेला प्रारंभ; मोदींनी खेळला हा मास्टरस्ट्रोक

नवी दिल्ली : जागतिक पातळीवर भारताचे वाढते सामर्थ्य अधोरेखित करणाऱ्या दोन दिवसीय G-20 शिखर परिषद अखेर राजधानी दिल्लीत आजपासून सुरू होत आहे. दोन दिवसीय परिषदेसाठी १९ राष्ट्रांचे प्रमुख व युरोपियन युनियनचे सदस्य दाखल झाले आहेत. याशिवाय काही निमंत्रित राष्ट्रही या परिषदेसाठी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या ‘भारत मंडपम’मध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. या वर्षी भारताकडे परिषदेचं अध्यक्षपद आलं आहे.

दिल्लीतील प्रगती मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘भारत मंडपम’मध्ये G-20 शिखर संमेलनाला सुरुवात झाली. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्रध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं. पण हे करत असताना त्यांनी देशाची ओळख ‘इंडिया’ अशी करुन न देता ‘भारत’ अशी करुन दिली. यावेळी आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांचा पूर्णवेळ सदस्य म्हणून जी २० मध्ये समावेश करण्याची घोषणा मोदींनी केली.

मोदी म्हणाले,  G-20 परिषदेत भारत सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. यावेळी ज्या ठिकाणी आपण एकत्रित आहोत इथून काही किमी अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचा एक स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिलंय की, मानवतेचं कल्याण आणि सुख हे कायम प्राथमिकता असायला पाहिजे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश संपूर्ण विश्वाला दिला होता. या संदेशाची आठवण करुन आपण या जी २० संमेलनाला सुरुवात करुयात”

G-20 शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जय्यत तयारी केली गेली आहे. परिषदेमधून वन अर्थ, वन फॅमिली, वन फ्यूचरचा मंत्री दिला गेलाय. समिट हॉलमध्ये आज सकाळी 10 पासून दुपारी 1 पर्यंत पहिलं चर्चा सत्र चालणार आहे. नरेंद्र मोदी यांनी संबोधन करताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा नारा दिला आहे. जगात अविश्वासाचं संकट सगळे मिळून दूर करू, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक परिवार, एक भविष्य’ ही यंदाच्या संमेलनाची संकल्पना आहे. ती भारतीय संस्कृतीवर आधारित ही असून जगभरातील अनेक समस्यांवर भारत तोडगा देऊ शकतो. जगभरातील नेत्यांसोबत सार्थक चर्चेची अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

हे नेते झाले दाखल
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, इटलीच्या पंतप्रधान जाॅर्जिया मेलाेनी, जपानचे पंतप्रधान फुमिओ किशीदा जर्मनीचे चान्सलर ओलाफ शाेज्झ, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राेन,, अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टाे फर्नांडिज, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रामाफाेस इत्यादी राजधानीत दाखल झाले आहेत. हे नेते जगातील विविध प्रश्नांवर पुढील दाेन दिवस विचारमंथन करणार आहेत.