Jalgaon News : जि.प. शाळेत पहिलीचा वर्ग भरतोय चक्क ओट्यावर

जळगाव : डांभुर्णी (ता. यावल) येथील जि.प. शाळेत इयत्ता पहिलीचे विद्यार्थी चक्क ओट्यावर बसून शिक्षण घेत असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने सरपटणार्‍या प्राण्यांसह माकडांचाही या शालेय परिसरात वावर असताना ओट्यावर विद्यार्थ्यांना बसवणे कितपत योग्य?  असा सवाल पालकांकडून उपस्थितीत होत आहे. प्रशासन व शिक्षण समितीने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गखोली नसल्याने मुख्याध्यापकांच्या कार्यालयातच तिसरीच वर्ग भरवला जात आहे. शालेय कामानिमित्त आलेले नागरिक याच वर्गात येत असल्याने दोन जणांमधील होत असलेल्या संवादाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा फटका बसत आहे.

याबाबतीत मुख्याध्यापक पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पहिलीच्या व तिसरीच्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खोलीच नाही. पहिलीचा वर्ग केंद्रप्रमुखांच्या दालनात बसवण्याची व्यवस्था केली, परंतु ते पावसाच्या पाण्याने गळते म्हणून त्यांना ओट्यावर बसवावे लागत आहे. तिसरीचा वर्ग हा माझ्या ऑफिसात बसवावा लागत असल्याचे पाटील यांनी सांगितलं.

लोकवर्गणीतून शाळेची सुधारणा
काही वर्षांपूर्वी लोकवर्गणीतून या शाळेची सुधारणा करण्यात आली, असे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, खोल्याची  डागडुजी झाली खरी परंतु ती फक्त दिसणार्‍या भागाची खोल्यांचा आतील मागील भाग व वरचे छत तसेच पडून असल्याने पावसाळ्यात त्याही खोल्या गळत असल्याचे सांगण्यात आले.

खोल्या मंजुरीसाठी प्रशासनाला प्रस्ताव
शाळेकडून नवीन तीन खोल्या मंजुरीसाठी प्रशासनाला प्रस्ताव पाठवला असल्याचेही मुख्याध्यापकांनी सांगितले तसेच ग्रामपंचायतीकडून खोलीतील बैठक व्यवस्था सुधारण्यासाठी तगादा लावला मात्र, पंचायतीकडून काम न झाल्याची खंत देखील मुख्याध्यापकांंनी यावेळी व्यक्त केली.

एका खोलीचा अभाव
या शाळेत एकूण सात खोल्या आहेत. यातील एक खोली मुख्याध्यापकांसाठी गेली. एका वर्गाच्या दोन तुकड्या भरतात. पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. यामुळे अशा एकूण आठ खोल्या पाहिजेत. प्रत्यक्षात सहा खोल्या आहेत. एक वर्ग मुख्याध्यापकांच्या खोलीत भरतो. पहिलीची एक तुकडी ओट्यावर भरविण्याची वेळ शाळेवर आली आहे.