---Advertisement---
धुळे : शहरातील तृतीयपंथीयांच्या किन्नर आखाड्याने या वर्षीही आपली १३८ वर्षांची जुनी परंपरा जपली आहे. वाजत-गाजत मिरवणूक काढून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. शहरातील येल्लमा देवी मंदिरात ही मूर्ती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती महामंडलेश्वर पार्वती जोगी नंदगिरी उर्फ रवी मामा किन्नर आखाडा, धुळे यांनी दिली.
या उत्सवादरम्यान सात दिवस गौरी पूजन, भजन आणि किन्नरांसाठी खास रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. याशिवाय सात दिवसात अन्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बुधवारी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत निलू जोगी महंत, अमळनेरचे दादू महाराज यांच्यासह स्वरा जोगी, शुभांगी जोगी, अलका जोगी, इशाका जोगी, राथा जोगी, अंबिका जोगी, आणि जान्हवी जोगी यांनी सहभाग घेतला होता. वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीत सर्व आनंदात नाचत होते.
नवसाला पावणारा गणपती
१३८ वर्षाची परंपरा असलेल्या हा गणपती नवसाला पावणारा आहे. त्यामुळे सात दिवसात अनेक भाविक नवस फेडण्यासाठी येतात. तर काही नवस मागण्यासाठी येतात. सात दिवस श्री गणेशाच्या दर्शनास भाविकांची गर्दी असते, असे महामंडलेश्वर पार्वती जोगी यांनी सांगितले.