‘गांधी गोडसे एक युद्ध’ वादाच्या भोवर्‍यात

मुंबई : ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा बहुचर्चित सिनेमा येत्या २६ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. पण रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यासोबत जोरदार घोषणाबाजी करत प्रमोशनदरम्यानच या सिनेमाला विरोध दर्शवण्यात येत आहे.

अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मागणी केली आहे की, ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमात नथुरामाला खलनायक दाखवल्यास सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचे शो बंद करण्यात येतील. तसेच गोडसे यांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यास हा सिनेमा करमुक्त करावा.  ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या सिनेमाच्या निषेधाबद्दल भाष्य करताना या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी म्हणाले, गांधी गोडसे एक युद्ध या सिनेमात महात्मा गांधी किंवा नथुराम गोडसे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे विरोधकांनी आधी सिनेमा पाहावा आणि त्यानंतर सिनेमावर टीका करावी. गांधी आणि गोडसे या दोन्ही पात्रांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.

गांधी गोडसे एक युद्ध हा सिनेमा २६ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार संतोषी यांनी सांभाळली आहे. राजकुमार ९ वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक करत आहेत. या सिनेमाला ए.आर.रहमान यांचं संगीत लाभलं आहे. तसेच या सिनेमात दीपक अंतानी महात्मा गांधी यांच्या भूमिकेत तर मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहे.

https://www.instagram.com/reel/CnRCccprtwj/?utm_source=ig_web_copy_link