पाळधी : येथील प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या मंदिराची दानपेटी फोडून त्यातील ५० हजारांच्या रकमेसह २२ हजारांचे दागिने चोरीस गेल्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.
पाळधी येथील महामार्गालगत असलेल्या सिद्धी गणपती मंदिरात(Ganapati temple Paladhi) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मागील दरवाजाच्या कुलुपाचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. या वेळी त्यांनी आधी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील जवळपास ५० हजारांची रक्कम व सिद्धी गणपतीच्या अंगावर असलेले ९ ग्रॅम वजनाचे दागिने, त्यांची रक्कम २२ हजार असा एकूण ७२ हजारांचा ऐवज लंपास केला.
या वेळी तेथे पुजारी झोपलेले असूनही त्यांना चोरांचा सुगावा लागला नाही. सकाळी मंदिर उघडण्यास गेले असता हा प्रकार लक्षात आला. पाळधी पोलिसांना हा प्रकार समजताच पाळधी पोलीस चौकीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली.
या वेळी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन चोरटे मध्ये जात असताना अस्पष्ट दिसत आहे. मंदिरावर सुरक्षा रक्षक नाही. घटनास्थळी चोपडा भागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी घोलप, धरणगावचे पो. नि. पवन देसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत तेथील व्यवस्थापक विनायक लक्ष्मण तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विठ्ठल पाटील करीत आहेत.