चोपडा : यावल वनविभागाचे गस्तीपथक विष्णापूर ते बोरमळी रस्त्यावर गस्त घालत असताना एक संशयीत खाजगी कार त्यांच्या निदर्शनास आली. सदर वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनातुन सागवान लाकुड तसेच गांजाची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. वनविभागाच्या धडक कारवाईत मात्र वाहन चालक फरार झाला आहे. रात्री उशिरापर्यत याबाबत अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
वनक्षेत्रपाल आनंदा पाटील, वनपाल रमेश थोरात, रामदास जाधव, वनरक्षक योगेश सोनवणे, सचिन तडवी, योगीराज तेली यांचे गस्तीपथक आज दि. २९ रोजी विष्णापूर ते बोरमळी रस्त्यावर गस्त घालत असतांना एम.एच.४३ व्ही.५३६६ ही इनोव्हा कार संशयीतरित्या जातांना दिसली. पथकाने सदर वाहनाचा पाठलाग केला असता विष्णापूर गावाजवळ बोरअजंटी रस्त्यावर कार चालक वाहन सोडून फरार झाला. गस्तीपथकाने या कारची तपासणी केली असता त्यात ११५७ रुपयांचे सागवान लाकडाचे ७ नग तसेच ६० ते ७० हजार रुपये किंमतीचा १८ किलो गांजा आढळला. गस्तीपथकाने सदर गांजा अडावद पोलीस ठाण्यात जमा केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असुन अडावदसह परिसरात मोठ्या प्रमाणावर गांजाची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे.