---Advertisement---
नागपूर : सोमवार (२२ सप्टेंबर) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या उत्सवातील देवीची आरास आणि गरब्याच्या जल्लोषाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नवरात्रोत्सवाआधीच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी पत्रकार परिषद घेऊन गरब्यात फक्त हिंदू सहभागी होऊ शकतात. मुस्लिमांना प्रवेश देऊ नये, अशा स्पष्ट सूचना आयोजकांना दिल्या आहेत.
गरब्यासाठी प्रवेश देताना आधारकार्ड तपासल्यानंतरच कपाळी टिळा लावावा आणि भगवान वराहच्या प्रतिमेला नमन अनिवार्य करण्यास म्हटले आहे. जर मुस्लिम तरुण गरब्यात सहभागी झाले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याची सूचना दिली आहे. वराह देवता आणि नवरात्रीचा तसा धार्मिक संबंध नसला, तरी ते आमचे देवता आहे, ते अवतार आहेत आणि काही विधर्मीचा वराह दर्शन केल्याने धर्म नष्ट होतो, त्यांचा धर्म खंडित होतो, असा त्यांचा समज आहे, म्हणून आम्ही तशी अट घातल्याचे विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले आहे.
जे हिंदू धर्माला मानत नाहीत, मूर्तिपूजेला मानत नाहीत, देवीमातेला मानत नाहीत, त्यांनी गरबास्थळी प्रवेशच कशाला करावा? म्हणून आम्ही अशा सर्व अटी घातल्याचे विश्व हिंदू परिषदेचे म्हणणे आहे. या अटीमुळे लव्ह जिहादला प्रतिबंध बसेल. गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे अशा प्रकारच्या अटी टाकल्यामुळे लव्ह जिहादचे प्रमाण थांबल्याचा दावा विहिंपतर्फे करण्यात आला. या सक्तीमुळे अनेक जण वेशभूषा बदलून गरबा खेळण्यासाठी येऊ शकतात. आयोजकांनी त्यांच्या वेशभूषेकडे न जाता त्यांचे आधारकार्ड तपासावे, त्यांच्या कपाळी भगवा टिळा लावावा आणि नंतर त्यांना भगवान वराह देवतेच्या प्रतिमेला नमन करण्यास सांगावे. तसेच प्रत्येक गरबा सोहळ्यावर बजरंग दल आणि विहिंप कार्यकर्ते लक्ष ठेवून असणार आहेत. मुस्लिम तरुण गरब्यात प्रवेश घेताना आढळला तर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करावे, नाहीतर आम्ही स्वतः त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा विहिंपने दिला आहे.