नंदुरबार : एकीकडे पावसाळ्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. यातच आता लसूणच्या दरातही मोठी वाढ झाली. यामुळे स्वयंपाकातील रोजच्या वापरात असलेल्या लसणाची फोडणी आता कमी होणार आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी लसूणच्या दरात मोठी वाढ होऊन ४०० रुपयांच्या वर गेले होते. मात्र मध्यंतरी आवक वाढल्यानंतर दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा लसूणाची आवक कमी झाल्याने दर वधारले असून प्रतिकिलो ३०० रुपये इतके लसूणचे दर झाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात लसणाची आवक आणखी कमी झाल्याने लसुनचे भाव तीनशे रुपये किलो पोहोचले आहेत. रोजच्या आहारात वापरण्यासाठी येणाऱ्या लसूण तीनशे रुपये किलोने विक्री होत आहे. यामुळे गृहिणींचे गणित कोलमडले आहे. मागच्या महिन्यात दोनशे रुपये किलोने लसुनची विक्री होत होती. मात्र लसुनची आवक कमी झाल्याने आता तीनशे रुपये किलो दराने विक्री होत आहे.
आणखी दर वाढण्याची शक्यता
सध्या लसणाचे दर वाढले असून येणाऱ्या काळात लसुनचे दर आणखीन वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पावसाळ्याच्या दिवसात लसणाची आवक हवी तशी होत नसल्याने भाव वाढण्याची शक्यता आहे. या शिवाय भाजीपाल्याचे भाव देखील शंभर पेक्षा अधिक झाले आहेत. त्यातच लसूणच्या दर तीनशे रुपये किलो गेल्याने सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठा आर्थिक अडथळा निर्माण झाला आहे.